MPSC ची परीक्षा देण्याआधीच ‘त्या’ कृत्यामुळे तो झाला गजाआड

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – एक शिक्षित तरुण आपल्या गरजा भागत नसल्याने गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आले आहे. आपली नोकरी सोडून हा तरूण दुचाकी चोर बनला आहे. पुण्यातील खर्च भागत नसल्याने आणि उच्चशिक्षित असतानाही परिस्थिती आणि जादा पैशांच्या लालसेपोटी तो गुन्हेगारीकडे वळल्याचे सांगितले जात आहे. याच चोरट्याच्या सोमवारी बीडमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने केली आहे. आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मुलाचे एमएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला पुण्याला पाठविले. मात्र तो गुन्हेगारीकडे वळला. या घटनेचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही असे प्रकार घडले आहेत.

शहाजी पुरी (२८ रा.खांडे पारगाव ता.बीड) असं या चोराचं नाव आहे. आई-वडिल, दोन बहिणी आणि एक भाऊ असा त्याचा परिवार. घरी तीन एकर शेती. शेतीवर कुटुंबाचा गाडा चालत नसल्याने वडील मजुरी करतात. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत त्याच्या वडिलांनी त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्याचा एमएससी पर्यंतचा सर्व खर्च केला. यानंतर तो दोन वर्षापासून पुण्यात होता. एका क्लासवर त्याने शिक्षक म्हणून कामही केले. याचा त्याला केवळ दहा ते बारा हजार रूपये पगार मिळायचा. या पगारात त्याच्या गरजा भागत नव्हत्या. मेट्रोसिटीमध्येही पगार खुपच कमी होता. त्याच्या अपेक्षा वाढल्याने त्याच्या मनात चोरीचा विषय जागा घेऊ लागला.

आपली नोकरी त्याने सोडल्यानंतर तो बीडला गेला. तेथे त्याने दुचाकी चोरली. यातून त्याला त्याला २५ हजार रूपये मिळाले. अचानक मिळालेल्या जास्त पैशाने त्याची हाव वाढली. त्यानंतर तो पुण्याला गेला. यातून त्याला चांगले पैसे येऊ लागल्याने त्याने दुचाकी चोरीचा व्यवसायच सुरू केला. यातून बरेच पैसे कमावले. सध्या त्याचा चोरीचा व्यवसाय जाेमात असतानाच सपोनि अमोल धस, पोउपनि रामकृष्ण सागडे यांना माहिती मिळाली. त्यांनी याबाबत सोमवारी सापळा लावला. या सापळ्यात शहाजी अलगद अडकला. त्याला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याच्याकडून विविध कंपनीच्या ४ दुचाकी जप्त केल्या.

शहाजीला सध्या बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल धस, नसीर शेख, साजीद पठाण, सखाराम पवार, राजू वंजारे, विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, गणेश नवले, रेवणनाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.

विकलेली दुचाकी पुन्हा चोरायचा
चोरीच्या बाबतीत शहाजीचा फंडा काही वेगळाच होता. एक दुचाकी चोरली की ती विक्री करून पैसे काढायचे. पुन्हा चार महिन्यांनी त्याच दुचाकीवर पाळत ठेवून तिची चोरी करायची, असा फंडा शहाजीचा होता. मालकाकडे कागदपत्रे नसल्याने त्याची दुचाकी चोरीला गेली की तक्रार द्यायला मालकाला पोलीस ठाण्यात जात येत नसे. ही सर्व गोष्ट शहाजीला चांगलीच ठाऊक होती. मग तो त्याच दुचाकीची पुन्हा विक्री करायचा. हा फंडा त्याचा अनेक ठिकाणी यशस्वी झाला होता.

अभ्यासात हुशार असलेला शहाजी  परिस्थितीमुळे तो गुन्हेगारीकडे वळला. त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. २८ फेब्रुवारीला त्याची एमपीएससीची लेखी परीक्षा होती परंतु तत्पूर्वीच त्याला अटक झाली.