8 महिन्याची गरोदर असूनही ती बजावतेय ‘कोरोना’ रुग्णांची सेवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. देशातील अनेक राज्यामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी लोकांच्या सेवेसाठी झटत आहेत. अशीच एक डॉक्टर गर्भावस्थेच्या आठव्या महिन्यात आराम करण्याचे सोडून सहा ते सात पीपीई किट घालून मुंबईतील मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची (eighth-month-pregnancy-she-performs-services-kovid-center ) सेवा बजावत आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेत आहे. त्या डॉक्टराचे नाव आहे, डॉ. सरिता दत्तात्रय बांबळे.
डॉ. सरिता या कल्याण परिसरात पती, सासू आणि साडेसहा वर्षांच्या मुलीसोबत राहतात. पतीही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या मुलीला नातेवाइकांकडे ठेवले. अशातच डॉ. सरिता यांना त्या गर्भवती असल्याचे लक्षात आले. सगळेच आनंदात होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात घरी बसणे त्यांना अस्वस्थ करत होते. दुसरीकडे कोविड सेंटरसाठी डॉक्टरांची वानवा असल्याने वैद्यकीय सेवेप्रति असलेले प्रेम आणि जबाबदारीमुळे त्यांनी त्याही अवस्थेत कोविड सेंटरमध्ये काम करण्याचे ठरविले. निर्मल केअरअंतर्गत मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये 15 जूनपासून ऑपरेशन हेड म्हणून त्या रुजू झाल्या. डॉ. सरिता म्हणाल्या, अशा काळात मी माझे कर्तव्य आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी विसरू शकत नाही. जर मी घरी बसले तर माझ्या शिक्षणाचा क़ाय उपयोग ? येथील प्रमुख डॉ. निर्मल जैन यांच्या प्रोत्साहनामुळे सर्व काम शक्य होत आहे.
कल्याणहून लोकलने मुलुंड येथील सेंटर गाठायचे दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी पुन्हा लोकलच्या गर्दीतून वाट काढत घरी जायचे असा त्यांचा दिनक्रम सुरु होता. मात्र त्यांनी त्यानंतर कोविड सेंटरमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. आणि आठवड्यातून एकदा मुलीला पाहण्यासाठी त्या घरी जाऊ लागल्या. 9 महिने उलटत आले त्यांनी अजून मुलीला जवळ घेतलेले नाही. कोविड सेंटरमध्ये 275 खटांची क्षमता असताना 300 हून अधिक रुग्णांची भर पडली. रुग्णांबरोबर येथील अन्य डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांची जबाबदारीही डॉ. सरिता यांच्या खांद्यावर आहे. एकेदिवशी त्या चक्कर येऊन कोसळल्या होत्या. अशातच एक कोरोना रुग्ण आला. बेड मिळत नसल्याने ओरड सुरु झाली. अशा अवस्थेतही त्यांनी थोडे बरे वाटताच स्वत:च्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि त्या रुग्णाला बेड उपलब्ध करून दिला. अशा अवस्थेतही त्या सेवा बजावत असल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.