झोपेत देखील ‘त्यांना’ सरकार जाईल असं वाटतं : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात काहीही घडले की भाजपवर टीका करायची असा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. ईडी ही अचानक कारवाई करत नाही. काहीतरी असेल म्हणूनच खा. राऊत (MP sanjay raut) यांच्या पत्नीला नोटीस पाठविली असेल ना, मग भाजपच्या नावाने शंख करायची गरज काय, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (BJP state president MLA Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा आहे. त्यांचा संबंध आमच्याशी जोडणे असमंजसपणाचे आहे. त्यांनी भाजपमधील 100 च काय 240 जणांची यादी द्यावी आणि कारवाईसाठी पाठपुरावा करावा. तसेच भाजपकडून ईडीसारख्या संस्थांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. तसेच त्यांना जर झोपेतही सरकार जाईल असे वाटत असेल तर मी काय करू, असा टोला पाटील यांनी सेनेला लगावला आहे.

राऊतांच्या बोलण्यात तथ्य – जयंत पाटील
केंद्र शासनाविरोधात बोलणाऱ्यांना ईडीकडून नोटीस बजावून त्रास देण्याचे व त्यांना बदनाम करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आता सर्वसामान्य जनतेला समजले आहे. मात्र, नोटीस बजावून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. तसेच राज्यातील सरकार पाडण्यासाठी ईडीकडून दबाव आणला जात असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगत आहेत, याचा अर्थ त्यात तथ्य असेल, असेही ते म्हणाले.