‘नक्षलवादा’वरील पुस्तकं माझ्याही घरात : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर झालेल्या एल्गार परिषदेतील लोकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अनेक साहित्यिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. पुणे पोलिसांनी चुकीचे गुन्हे दाखल केले असून, याची चौकशी व्हावी. तसेच स्पेशल एसआयटीची स्थापना करून यामार्फत चौकशी व्हावी. अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, एल्गार परिषदेच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद आहे. केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे. म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. तशी पुस्तकं माझ्या घरातही आहेत. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणे चुकीचे आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भाजप सरकारच्या काळात उद्भवलेल्या विविध सामाजिक संघर्षावर भाष्य केले.

पुणे पोलिसांनी अनेक लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. अनेकांना अटकही करण्यात आली होती. आजही त्यापैकी काहीजण न्यायालयीन लढाई लढत आहेत. यावर शंका उपस्थित करताना शरद पवार म्हणाले, एल्गार परिषदेत नामदेव ढसाळ यांच्या कविता म्हटल्या म्हणून काही जणांवर खटले दाखल करण्यात आले. पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/