Pune : Lockdown मध्ये पुण्यात दुप्पट दराने मद्य विक्री, फेसबुकवरील जाहिरातीमुळे ‘तो’ गोत्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अनेक व्यवसाय बंद आहेत. असे असताना अनेक जण कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करुन आपले व्यवसाय सुरु ठेवत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाईन शॉप बंद आहेत.याचा फायदा घेत अनेकजण दुप्पट किमतीत दारुची विक्री करत आहेत. तर घसा ओला करण्यासाठी अनेक जण दुप्पट भावात मद्य खरेदी करत आहेत. काही ठिकाणी तर मद्याची विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर येथे एका व्यक्तीने दारुची विक्री करण्यासाठी चक्क फेसबुकवर जाहीरात केली. त्याने केलेल्या जाहीरातीमुळे तोच गोत्यात आला आहे. या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकून मद्य विक्रीची जाहीरात केली. याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून काही बाटल्या आणि इतर वस्तूंचा साठाही जप्त केला आहे. आरोपी विरोधात मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. राजीव अग्रवाल (रा. भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी संतोष झगडे यांनी सांगितले की, हडपसर परिसरामध्ये फेसबुकच्या माध्यमातून दारु विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर ही जाहीरात कोणी दिली याची खातरजमा करण्यात आली. जाहीरातीमध्ये देण्यात आलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला आणि दारुची मागणी केली. त्यानंतर समोरील व्यक्तीने हडपसर परिसरातील गाडीतळ याठीकाणी दारु देतो असे सांगितले. त्यानुसार गाडीतळ परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपी दारू घेऊन आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तो दुप्पट किमतीत मद्य विक्री करत होता. त्याच्याकडून मद्याच्या 28 बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती संतोष झगडे यांनी दिली.

ही कारवाई विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधिक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक दीपक सुपे, महेश लेंडे, राहुल खाडगीर, निनाद निकम, कुणाल भांगरे, तात्याबा शिंदे आणि सागर धुर्वे यांनी केली.