‘आता तरी भाजपानं प्रमाणिकपणे विरोधी पक्षाचं काम करावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – “भाजपच्या पुणे, नागपूरच्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजय प्राप्त केला. आतातरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिक काम करावे,” असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या निकालातून महाविकास आघाडीच्या एकजुटीचे फळ मिळाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपला औरंगाबादसोबत हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघांत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसत आहे.

या विजयानंतर रोहित पवार यांनी महाविकास आघाडीचे अभिनंदन केले आहे, तसेच भाजपला जोरदार टोलाही लगावला आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तर महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेवून भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे.”

अजून एका ट्विटमध्ये रोहित पवारांनी लिहिले की, “भाजपच्या म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आतातरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रमाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.”