स्वारगेट-हडपसर BRT मार्ग नाही तरीसुद्धा बसथांबे रस्त्यात, सूचना फलकामुळे वाहनचालकांचा गोंधळ

पुणे : स्वारगेट-हडपसर दरम्यानचा दीड-दोन किमीचा बीआरटी मार्ग मागिल दीड वर्षापूर्वी काढून टाकला आहे. मात्र, बसथांबे रस्त्यात असल्याने प्रवाशांना धोकादायक ठरत आहेत, तर बीआरटीसाठीचे सूचना फलक वाहनचालकांना गोंधळात टाकणारे ठरत आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गच शिल्लक नाही, तर सूचना फलक तातडीने हटवावेत, तसेच बसथांबेही रस्त्याच्या बाजूला घ्यावेत, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून केली जात आहे.

सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी चौकातील वाहूतक शाखेसमोरील सिग्नलच्या खांबावर फक्त सार्वजनिक बसकरिता असा फलक लटकला आहे. या ठिकाणी बीआरटी मार्ग शिल्लक नाही. मग सूचना फलक का लावला आहे, तसेच चौकात पुण्याकडे आणि हडपसरकडे जाणाऱ्या बसेससाठीचे थांबे आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून बसथांब्यापर्यंत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अपंगांची हेळसांड होत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून येथील सूचना फलक हटवावेत, तसेच बसथांबा रस्त्याच्या बाजूला घेऊन प्रवासांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे.

महापालिकेतील बीआरटी विभागाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मागिल अनेक वर्षांपूर्वी पहिला-वहिला कात्रज-स्वारगेट-हडपसर असा बीआरटी मार्ग 2005 साली सुरू केला. त्यावर टीकाटिपण्णी वारंवार झाली, त्यानंतर तो बंद पडला. पुन्हा कात्रज-स्वारगेट सुरू झाला. दरम्यान, स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्ग काढून टाकला असला तरी, बसथांबे दिमाखात उभे आहेत, तर फक्त बीआरटी बसेससाठी असा सूचना फलकही वैदुवाडी चौकातील सिग्नलच्या खांबावर लटकलेले दिसत आहे. बीआरटी मार्गच शिल्लक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. प्रशासनाने बीआरटी मार्ग काढला, तशाच पद्धतीने फलक आणि रस्त्याच्या मध्ये असलेले बसथांबे हटवून बाजूला करून प्रवाशांसह वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेतील बीआरटीच्या प्रमुखांनी स्वारगेट-हडपसर बीआरटी मार्ग शिल्लक आहे का याची पाहणी करून, बसथांबे आणि सूचना फलक तातडीने हटविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. तुटपुंज्या बीआरटीमुळे वाहतूककोंडी आणि वाहनचालकांचा गोंधळ होऊन अपघाताची मालिकाच सुरू होती. त्यामुळे 2019 साली नगरसेवक योगेश ससाणे यांनी बीआरटी मार्गासाठीचे दुभाजक काढून टाकले. मात्र, दरम्यानच्या काळात लॉकडाऊन झाल्यामुळे बसथांबे जैसे थे राहिले आहेत. त्यासाठी बीआरटी प्रशासनाने वाहतुकीला आणि प्रवाशांना अडगळीचे ठरणारे बसथांबे काढून रस्त्याच्या बाजूला घ्यावेत, अशी मागणी हडपसरमधील अभ्यासकांनी केली आहे.

नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले की, सोलापूर रस्ता डीपीमध्ये 60 मीटर रुंदीचा दाखविला आहे. त्याचबरोबर बीआरटी प्रकल्प राबविण्यासाठी किमान 45 मीटर रस्ता रुंद असणे अपेक्षित आहे. मात्र, सद्यस्थितीत सोलापूर रस्ता 36 मीटर आहे. त्यामुळे येथे बीआरटी प्रकल्प राबवता येणार नसल्याने बीआरटीचे बसथांबे प्रशासनाने बाजूला घ्यावेत. तसेच सायकलट्रॅक आणि पदपथ काढून रस्ता रुंद करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे अपेक्षित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माजी उपमहापौर निलेश मगर म्हणाले की, महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे एमएसआरडीसीकडून रस्त्याची कामे करून घेण्याची गरज आहे. स्वारगेट-हडपसर दरम्यानचा बीआरटी मार्ग कायम धोकादायक ठरला आहे. सोलापूर रस्ता रुंदीकरणादरम्यान, बीआरटी मार्ग, सायकलट्रॅक, पदपथ राबविण्याचा उपक्रम सुरू केला. त्यातील एकही प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झाला नाही. दरवर्षी रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मागिल 30 वर्षांपासून सोलापूर रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सायकलट्रॅक कुठेच नाही. मात्र, सायकल ट्रॅक हडपसरवासियांच्या माथी मारला आहे. सोलापूर रस्त्यावर प्रमुख चौकामध्ये ग्रेड सेपरेटर करावेत. 2006 साली राज्य शासनाला रस्ते करण्यासाठी पत्र दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पालिकेतील रस्ते विभागाचे व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले की, बीआरटी मार्ग आणि सूचना फलकाविषयी निर्णय झाला नाही. मात्र, पुढील पंधरा दिवसात बसथांबे रस्त्याच्या बाजूला घेतले जाणार आहेत. तसेच सार्वजनिक बसेससाठी आणि बीआरटी मार्गासाठीचे सूचना फलकही काढून टाकले जातील, असे त्यांनी सांगितले.