राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, दर 3 मिनिटाला एकाचा मृत्यू अन् तासाला 2 हजाराहून अधिक जणांना बाधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यात रविवारी (दि.18) तब्बल 68 हजार 631 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही एका दिवसातील राज्यातील सर्वात मोठी आकडेवारी आहे. धक्कादायक म्हणजे राज्यात दर 3 मिनिटाला एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत आहे. तर एका तासाला 2 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा होत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. तरीही रुग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत नाही. राज्यातील कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे. मुंबईतही कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य आहे. या लाटेत ग्रोथ रेटही वाढत आहे. मुंबईत करोनाचा ग्रोथ रेट वाढून 1.53 टक्के झाला आहे. ग्रोथ रेट वाढत असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी व मृत्यू दरात काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.