रस्त्यावरील खड्ड्यांबाबत केलं ‘असं’ आंदोलन की, सगळेच पहातच राहिले !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर-रांजणी रस्त्यावरील खड्ड्यांवर रांगोळी काढून खड्ड्यांन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सर्वपित्री अमावस्या व बैलपोळा निमित्तानं आंबेगाव तालुका प्रशासनाचं वाभाडं काढलं आहे. तालुका ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी हे अनोखं आंदोलन केलं आहे. मंचर एस कॉर्नर, चांडोली खुर्द, चांडोली बु, खडकी फाटा, थोरांदळे, रांजणी अशा इतर ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, संघटक सुभाष मावकर, गणेश थोरात, कैलास मावकर, प्रमिला टेमगिरे, मंगेश टेमगिरे, दगडू लोखंडे, संदीप वाबळे, संतोष बांगर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख नितीन मिंडे यांच्यासह या मार्गावरील प्रत्येक गावातून उत्स्फूर्तपणे 50 ते 60 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी कोरोनाच्या नियमांचं पालनही करण्यात आलं.

मंचर रांजणी हा 112 क्रमाकांचा राज्य मार्ग आहे. या मार्गावरून पुणे, मंचर मार्गे बेल्हे, अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांना जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. आंबेगाव तालुक्याचा आणि जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग मंचरकडे याच मार्गानं प्रवास करतो. या मार्गावरून शेतमाल आणि दूध यांची वाहतूक होते. विद्यार्थी मोठ्या संख्येनं या मार्गावरून प्रवास करतात.

एका तासाला या मार्गावरून सुमारे 200 ते 400 लहानमोठी वाहनं धावत असतात. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही.

पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे नितीन मिंडे यांनी सांगितलं की, “प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आहे. प्रशासनानं या मार्गावरील खड्डे त्वरीत बुजवावेत असं आवाहन पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे नितीन मिंडे यांनी केलं आहे. या अभिनव आंदोलननं प्रशासनाला जाग येईल असं ते म्हणाले आहेत.