‘उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे यांच्यात मनोमीलन व्हावे हीच सर्वांची इच्छा’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात पुन्हा मनोमीलन पूर्ववत व्हावे, हीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे, असे असताना मी न बोललेले विधान प्रसिद्ध करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी व्यक्त केले.

मेढा ता. जावळी येथे पंचायत समितीच्या सभापतिपदी जयश्री सुहास गिरी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी उपस्थित होतो. नूतन सभापतींनी सर्वांना विश्वासात घेवून काम करावे. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जी जबाबदारी गिरी दाम्पत्यावर सोपवली आहे ती यशस्वी होणार आहे, असे सांगून मी शुभेच्छा दिल्या. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांच्याविषयी एक शब्दही मी बोललो नाही. याला सर्व उपस्थित कार्यकर्ते साक्षीदार आहेत. मी जे बोललो त्याचे रॅकॉर्डिंग माझ्याकडे आहे.

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यात यापूर्वी असलेले मनोमीलन पूर्ववत व्हावे, अशी माझ्यासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मनोमीलन तुटल्यापासून प्रत्येक निवडणुकीत दोन्ही राजे समोरासमोर येत आहेत. किरकोळ कारणांवरून दोघांमध्ये वाद होत आहेत. याचा त्रास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होत आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही राजे एकत्र येेणे गरजेचे आहे. मी स्वत: आ. शिवेंद्रसिंहराजे यांना अनेकदा तुम्हा दोघांमधील वाद मिटवा, असे सांगितले आहे.

दोघे एकत्र आलात तर वाद संपतील. सातारा शहरात पुन्हा शांतता निर्माण होईल. गेल्या काही दिवसांपासून आ. बाबाराजेही राजघराण्याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यांच्याही मनात मनोमीलन व्हावे, असेच आम्हाला वाटते. माझ्या वाढदिवसाला स्वत: खा.उदयनराजे यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या. मनोमीलनाच्या काळात उदयनराजेंच्या दोन्ही खासदारकीच्या निवडणुकीत जावली तालुक्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. ती पूर्ण ताकतीने पार पाडली आहे. मनोमीलनाविषयी सध्या चांगली चर्चा होत असताना मी खा. उदयनराजे भोसले यांच्याविषयी असे बोलणे शक्यच नाही. असे वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले.