व्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्यापासून राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याच अनुषंगाने सर्व आमदार नागपूरला अधिवेशनासाठी पोहचलेले आहेत. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी फडणवीसांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांना प्रश्न विचारला असता आघाडी सरकारची मानसिकता आहे त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती त्यांनी दिली.

महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी अनेक जण देव पाण्यात घालून बसलेत. परंतु शरद पवार, सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाणकार आणि प्रगल्भ नेते आहेत. ते योग्य तीच भूमिका घेतील असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. सावरकरांबाबतच्या प्रकरणावर अजित पवार यांना विचारले असता यावेळी त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी असते आणि सरकारमध्ये नसताना मागणी करणे सोप्पे असते. परंतु सरकारमध्ये असल्यावर खऱ्या आर्थिक परिस्थितीची माहिती येते. त्यामुळे सगळी सोंग घेता येतात परंतु व्यवहारात पैशाचे सोंग घेता येत नाही असे स्पष्ट मत अजित पवार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.

मी अर्थमंत्री म्हणून काम केलंय, जयंत पाटील यांनी 9 वर्षे काम पाहिलंय. तर, सुनिल तटकरे यांनीही 1 वर्ष अर्थमंत्रीपद सांभाळलंय महाविकास आघाडीची मानसिकता ही काम करण्याची आहे असे देखील अजित पवार म्हणाले.

कोणताही निर्णय घेताना राज्यामध्ये जो अधिकारी वर्ग आहे त्यांचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट, सर्व वर्गांसाठी दिलेला निधी विकास कामांवर परिणाम होणार नाही हे लक्षात घेऊन कितपर्यंत आपण कर्ज उचलू शकतो, आपलं उत्पन्न किती आहे, केंद्र सरकार कितपत मदत करणार आहे या हा सर्व विचार करायचा असतो असे अजित पवार यावेळी म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/