जळगाव : चक्क सुट्टीच्या दिवशी बँकेतच 38 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, मॅनेजर शर्माला अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या 38 वर्षीय महिलेवर व्यवस्थापकाने सुट्टीच्या दिवशी बॅंकेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्टेट बँकेच्या शिवशंकर कॉलनी शाखेत हा प्रकार घडला असून जिल्हा पेठ पोलिसांनी व्यवस्थापकाला मंगळवारी (दि. 16) अटक केली आहे.

अशोक सिताराम शर्मा (रा. मुंबई) असे अटक केलेल्या बॅंक व्यवस्थापकाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 2017 मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी पीडीत महिला मैत्रीणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या शाखेत गेली होती. यानंतर व्यवस्थापकाने 15 दिवसांनी महिलेस सुटीच्या दिवशी बँकेत बोलावले. बँकेत कोणीही नसल्याची संधी साधत शर्मा याने तिला गुंगीचे औषध टाकून शितपेय पिण्यास दिले. त्यानंतर त्याने बँकेतच त्यांच्यावर अत्याचार केला. तसेच त्याचवेळी आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ तयार केले. या व्हीडीओद्वारे त्याने महिलेला ब्लॅकमेल करुन लग्नाचे आमीष दाखवले. त्यासाठी महिलेस पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडल्याचे पीडितीने फिर्यादीत म्हटले आहे.