खळबळजनक ! खासगी वाहनं, दुकानात सापडल्या ईव्हीएम मशीन ; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या व्हिडीओमध्ये ईव्हीएम मशीन्स अनधिकृत ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचं दिसतयं. यापैकी काही मशीन्स स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचं दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यामध्ये काहीजण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स गाडीतून बाहेर  काढून एका दुकानाच्या आत नेत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली येथील हा व्हिडीओ आहे. दरम्यान, महाआघाडीचे उमेदवार अफजल अन्सारी जे बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांनी ईव्हीएमची अदलाबदली केली जात असल्याचा आरोप केला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरुन संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएमसोबत छेडछाड करणं फोन टॅप करण्याइतकं सोपं आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे.

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनीही खासगी वाहनांमध्ये ईव्हीएम का सापडत आहेत ? असा सवाल उपस्थित केला असून सपाकडूनही छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएम सुरक्षित नसल्याचा विरोधकांचा आरोप असून यासंबंधी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.