मध्यप्रदेशात मतदाना दरम्यान मतदान यंत्रात बिघाड 

भोपाळ :  मध्यप्रदेश वृत्तसंस्था – मध्यप्रदेश आणि मिझोरम विधानसभेसाठी आज मतदान सुरु आहे. मध्यप्रदेशाच्या २३० आणि मिझोरमच्या ४० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान घेतले जात आहे. परंतु या निवडणूक कार्यक्रमात मध्यप्रदेशातील ७० मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. मतदान यंत्रात बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर तात्काळ नवीन मतदान यंत्र पाठवण्यात आली आहेत असे राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे. या प्रकारा बद्दल काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांनी सर्वप्रथम ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

मध्य प्रदेश विधानसभेसाठी ५ कोटी ४ लाख ९५ हजार २५१ मतदार मतदान करत असून यात २ कोटी ६३ लाख १ हजार ३०० पुरुष तर २ कोटी ४१ लाख ३० हजार ३९० महिला मतदान करणार आहेत. तसेच १३८९ तृतीय पंथी मतदार मतदान करत आहेत. दुपारी बारा वाजे पर्यंत १६ % मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर वरून मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे सांगितले. त्याच बरोबर त्यांनी नवीन मतदान यंत्रे जोडल्या नंतर ५० ते १०० मते टाकून यंत्र व्यवस्थित काम करत आहेत का याची खात्री करून घ्यावी असे ट्विट केले आहे.

मध्यप्रदेश विधान सभेच्या सर्व जागांसाठी आज मतदान पार पडत असून काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे .भाजपच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावण्याच्या मनसुब्याने काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरली असून भाजपने राज्यात केलेल्या विकासाच्या बळावर राज्यात  जनतेला पुन्हा सत्ता मागीतली आहे. भाजपचे मुख्यमंत्री शिवराज चौहान हेच मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे मानले जात असून मध्यप्रदेशात भाजपसाठी चांगले वातावरण असल्याचे प्रसार माध्यमांच्या वर्तुळात बोलले जाते आहे.

तर काँग्रेसमध्ये दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांनी प्रचाराची कमान सांभाळली होती तर खासदार ज्योतीरादित्य सिंदिया यांनी आपल्या घणाघाती वक्तृत्वाने निवडणुकीच्या सभा गाजवल्या होत्या. मध्यप्रदेशाच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी रणनीतीच्या सुसूत्रबद्ध हालचाली करून काँग्रेसला गारद करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत कोण विजय संपादित करणार या बद्दल सामन्यांना  उत्सुकता  मोठी लागली आहे.