साध्वी यांच्या उमेदवारीवर ७० निवृत्त IPS, सनदी अधिकारी संतप्त ; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साध्वी प्रज्ञासिंह यांना दिलेल्या उमेदवारीवरून ७० निवृत्त सनदी अधिकारी संतप्त झाले असून त्यांनी प्रज्ञासिंह यांनी शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर संतत्प होऊन खुलं पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी साध्वींची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे.

एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी कोठडीत असताना मला त्रास दिला. आपल्या शापामुळे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा विनाश झाला असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं होतं. त्यानंतर देशभर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यावर भाजपने ती त्यांची वैयक्तिक भूमीक आहे असे स्पष्ट केले होते.

या सर्व प्रकारावर ७० निवृत्त सनदी अधिकारी संतप्त झाले असून त्यांनी खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रावर पंजाबचे माजी पोलीस महासंचालक जुलिओ रिबेरो, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सराकर यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. करकरे हे प्रेरणादायी होते, त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेकांना हे माहित होते. त्यांचा अनादर करणे खेदजनक आहे. देशाने करकरे यांच्यासारख्या अधिकाऱ्याचे बलिदान स्मरणात ठेवण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतरांनी लक्ष घालून प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करावी असे पत्रात म्हटले आहे.