माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आयटम शब्द पडला महागात, निवडणुकीतील ‘हे’ पद काढलं

भोपाळ : वृत्तसंस्था – एका महिला उमेदवाराबद्दल ‘आयटम’ अशी कुत्सित टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना शुक्रवारी दणका दिला आहे. कमलनाथ यांच्या वादग्रस्त विधानांची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांचे नाव ‘स्टार प्रचारक’ यादीतून हटवले आहे.

कमलनाथ यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने करुन आचारसंहितेचा भंग केला आहे. आयोगाने त्यांना समज दिली होती, त्याची दखल कमलनाथ यांनी घेतली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या ‘स्टार प्रचारक’ यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले. तद्वतच, यापुढे कमलनाथ यांच्या सभेचा, विमान वाहतुकीचा खर्च उमेदवाराला करावा लागणार आहे. निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारकाचा खर्च पक्षाच्या खात्यातून करण्यात येत असतो.

काय आहे वाद ?
मध्यप्रदेशमध्ये ३ नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी काँग्रेसच्या वतीने कमलनाथ प्रमुख प्रचारक आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवास केला. त्यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामा देत भाजपमध्ये जाणे पसंत केल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी डबरा येथे जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला होता. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त तिला ओळखता, तुम्ही मला पहिल्यांदा सावध करायला हवे होते, ही काय आयटम आहे, अशी टिप्पणी कमलनाथ यांनी केली होती.

दरम्यान, लोकांनी कमलनाथ यांना धडा शिकवला पाहिजे. एका गरीब आणि मजूर कुटूंबातून आलेल्या इमरती देवी यांना आयटम आणि जिलेबी संबोधने अत्यंत निंदनीय आणि आपत्तीजनक आहे. ही कमलनाथ यांची मानसिकता आहे. महिले सोबतच दलितांचा अपमान करणाऱ्या कमलनाथ यांना लोकांनी धडा शिकवलं पाहिजे, असे आवाहन राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले होते.