डोंबिवलीत 84 वर्षीय पतीनं धारदार हत्यारानं वार करून केला 80 वर्षीय पत्नीचा खून, जाणून घ्या प्रकरण

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाईन – एका 84 वर्षीय वृध्द पतीने धारधार हत्याराने 80 वर्षीय वृध्द पत्नीची हत्या केली. डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात रविवारी (दि. 31) सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वृध्द व्यक्तींकडून हे कृत्य घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिला व आरोपी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांचे ते आई-वडील आहेत.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे.

पार्वती बळीराम पाटील (वय 80) असे हत्या झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. तर बळीराम पाटील (वय 84) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळीराम हे तापट स्वभावाचे असल्याने दोघा पती- पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. आरोपीने पार्वती यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केली होती. पार्वती या त्यांच्या रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या अंगावरील कपडे जळालेल्या अवस्थेत होते. शनिवारी मध्यरात्री अडीच ते रविवारी सकाळी आठ च्या दरम्यान ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपीला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कल्याण परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न आरोपीने केला आहे . दरम्यान, ही हत्या घरगुती भांडणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून आरोपीला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.