भाजपमध्ये प्रवेशानंतर 24 तासात माजी फूटबॉलपटूनं सोडलं ‘राजकारण’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी भारताचा माजी फूटबॉलपटू मेहताब हुसैन यांनी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्याचे म्हटले आहे. कोलकातामध्ये ‘मिडफिल्ड जनरल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेहताब हुसैन यांनी आपण राजकारण सोडत असून वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगितले आहे.

मेहताब हुसेन यांनी काल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मेहताब हुसेन यांच्या हाती यावेळी भाजपचा झेंडा देत ‘भारत माता की जय’ घोषणा देण्यात आल्या. पण प्रवेश केल्याच्या दुसर्‍याच दिवशी मेहताब हुसेन यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत, आपण सध्याच्या घडीला कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही.

मी घेतलेल्या निर्णयाबद्दल शुभचिंतकांची माफी मागतो, असे म्हटले आहे. हा निर्णय घेण्यासाठी कोणीही जबरदस्ती केलेली नाही. राजकारणापासून दूर राहण्याचा हा आपला वैयक्तिक निर्णय आहे. भारताकडून 30 फूटबॉल सामने खेळणार्‍या आणि दोन गोल करणार्‍या मेहताब हुसेन यांनी आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असल्याने राजकारणात प्रवेश करत असल्याचे म्हटले होते.