काँग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री भ्रष्टाचार प्रकरणात ताब्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – दोंडाईचा पालिका क्षेत्रातील घरकुल योजनेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कामगार, विधी-न्याय राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना आज (सोमवार) सायंकाळी ताब्यात घेण्यात आले. देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, आज सायंकाळी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. तसेच त्यांनी या निर्णयाला आव्हान देणारा अर्जही खारीज करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दोंडाईचा पालिका एकात्मिक गृहनिर्माण योजनेमध्ये ७७ कोटींच्या निधीतून घरकुल योजना राबवण्यात आली होती. यामध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये तीन वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख, तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंह सोनवणे, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, राजेंद्र शिंदे, अमोल बागूल यांचा समावेश आहे.

या प्रकरणी कृष्णा नगराळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, चौकशीला विलंब होत असल्याने नागराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने चार आठवड्यात गुन्हा दाखल करण्याची सुचना दिली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जामीनावर २९ जुलैला कामकाज होणार आहे.

या प्रकरणातील इतर आरोपींना अंतरिम जामीन मिळाला आहे. तर डॉ. देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात कामकाज होते. न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून लावल्याने डॉ. देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ. देशमुख यांचे वय ८१ असल्याने त्यांच्या अटकेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे जिल्हा पोलीस प्रशासनाने सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त