शिरुर : ५ जुन पासुन माजी आमदार अशोक पवार यांचे आमरण उपोषण

शिरूर : पोलिसनामा ऑनलाईन –  शिरुर तालुक्यातील घोड धरणात पाणी कमी होत चालले असून रांजणगाव गणपती एमआयडीसीचा एक्स्प्रेस फिडर चौवीस तास पाणी उपसा औद्योगिक कारणांकरीता करीत आहे.पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून औद्योगिक कारणासाठीचे पाणी बंद करावे अन्यथा पाच जून २०१९ पासून शिरूर तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी आमदार अशोक पवार यांनी दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की जलसंपदा विभागाने पाणी वाटपाचे प्राधान्यक्रम ठरविले आहे. पाणी वापराचा सुधारित प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे आहे . पशुधनासह पिण्यासाठी पाणी तसेच शीतकरण आरोग्य आणि स्वच्छता विषयक गरजा यासाठी घरगुती वापर. कृषी सिंचनाकरीता (पाणी वापर ) औद्योगिक ,वाणिज्यिक वापर व कृषी उत्पादनावर आधारित उद्योगासाठी वापर. पर्यावरण व करमणूक यासाठी वापर, व इतर सर्व प्रकारच्या वापरासाठी असे प्राधान्यक्रम आहेत.

मागील काही वर्षात जून महिन्यामध्ये शिरूर तालुक्यात पाउस पडलेला नाही. शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाने पाणी देण्यात यावे व बाकीचे तास कमी करण्यात यावे. या संदर्भात शिरूरचा तहसील कार्यालयाकडे निवेदन २० मे रोजी देण्यात आले होते. एम आय डी सी साठी पाईपलाईन द्वारे प्रती तास किती गॅलन पाणी मिळते व त्या पाण्याचा वापर किती लोकसंख्येसाठी व किती जनावरांसाठी करत आहे याचे पत्र लेखी देण्याची मागणी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. एम.आय.डी.सी.ला व त्यावर अवलंबित असणा-या पिण्यासाठीच्या पाणी पुरवठा योजनेचा वापर सोडून औद्योगिक कारणासाठी पाणी बंद करण्यात यावे अशी मागणी पवार यांनी निवेदनात केली आहे.