रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव पुन्हा ‘मनसे’त, शिवसेनेच्या खैरेंवर जोरदार ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे. आता आपण मराठवाड्यात जोमाने कामाला लागणार असे सांगत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी भाकित केले की चंद्रकांत खैरे पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत.

2009 साली हर्षवर्धन जाधव मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढले होते, त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेला देखील जय महाराष्ट्र करत त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. लोकसभेवेळी औरंगाबादमधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढली. यात त्यांना अपयश आले परंतु त्यांनी तीन लाखाच्या आसपास मतं मिळवली. त्यांच्या या मुसंडीने शिवसेनेचे उमेदवार आणि दिग्गज नेते चंद्रकात खैरेंचा पराभव झाला आणि एमआयएमचा उमेदवार निवडून आला. तेव्हापासून खैरे आणि जाधव यांच्यात वात आहे. दोघेही सतत एकमेकांवर टीका करत असतात.

त्यानंतर आता जाधव यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर खैरे यांच्यावर टीकास्त्र डागले. खैरेंनी माझ्यावर व्यक्तिगत टीका करणं थांबवावं आणि त्यांनी खासदारकीचं स्वप्न आता सोडून द्यावे. ते आता पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत असंही हर्षवर्धन जाधव म्हणाले.

मनसे प्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, मधल्या काळात मी थोडा विचलित झालो होतो. काही गैरसमज होते, ते आता दूर झाले आहेत. मनसे योग्य मार्गाने चालली आहे. मनसेचा हिंदुत्वाचा मुद्दा देखील योग्य आहे. मुंबईतील मोर्चातही मी उद्या सहभागी होईल.

मनसे भाजप युती ? –
दानवेंचे जावई मनसेत गेल्याने मनसे भाजप युतीला बळकटी मिळताना दिसत आहे. परंतु हर्षवर्धन जाधव यांनी ही चर्चा फेटाळली. दानवेंचा जावई असलो तरी मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. खासदारकीची निवडणूकही मी स्वताच्या ताकदीवर लढवली होती. मला 2 लाख 83 हजार मतं मिळाली. आख्खा महाराष्ट्रात कुठलाही अपक्ष उमेदवार एवढी मतं मिळली नाहीत. त्यामुळे माझ्या राजकीय निर्णयांशी कौटूंबिक आयुष्याचा संबंध जोडू नका असेही ते म्हणाले.

प्रकाश महाजन पुन्हा मनसेमध्ये –
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी देखील आज मनसेमध्ये प्रवेश केला. याआधी देखील ते मनसेमध्ये होते. परंतु काही काळ ते दूर होती. आता पुन्हा एकदा ते स्वगृही परतले आहेत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक सुहास दशरथे यांनी देखील मनसेची वाट धरली आहे. सुहास दशरथे यांचा मनसेतील प्रवेश शिवसेनेसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे.