‘या’ माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश ; भुजबळांना देणार टक्कर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा-शिवसेना पक्षामध्ये इनकमींग सुरु झाले असून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत घरवापसी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याणराव पाटील राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना टक्कर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे येवल्याची निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित झाले आहे.

येवला-लासलगाव मतदार संघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी या मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. मागील पंचवार्षीक निवडणुकीवेळी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते.

मागील अनेक दिवसांपासून कल्याणराव पाटील हे शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज (शुक्रवार) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवबंधन बाधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत येवला विधानसभा मतदारसंघ शिवसेना पुन्हा ताब्यात घेईल असा विश्वास त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. पण छगन भुजबळ यांनी हे वृत्त फेटाळले आहे. मी शिवसेनेत जाणार नाही. शिवसेनेत जाण्याच्या चर्चेला तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले.

आरोग्यविषयक वृत्त