‘ओबीसी असल्यानं पंकजा मुंडेंचं खच्चीकरण’, ‘या’ नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवरून राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. त्यानंतर पकंजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपण पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष सोडणार नाही. जे काही बोलयचं ते 12 डिसेंबरला बोलेल असे सांगून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, पूर्वाश्रमीचे भाजपचे माजी आमदार आणि धनगर समजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये खच्चीकरण केले जात असल्याचा दावा केला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे निराश झाल्या. त्यानंतर त्या फारशा सक्रिय दिसल्या नाहीत. त्यातच त्यांची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्याने पंकजा मुंडे पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा सुरु झाली. ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केलेले अभिनंदन आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर भाजपमधील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन फेसबुक पोस्टचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे सांगत त्या पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले.

यानंतर माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केला आहे. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपने केला होता. मात्र, त्याला विरोध केल्याने तो ठराव फेटाळण्यात आला होता. तेच पंकजा मुंडे यांच्याबाबतीत केले जात आहे. ओबीसी असल्याने त्यांचे खच्चीकरण करण्यात येत असून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत जावे असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

Visit : policenama.com