बिजलीमल्ल, माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

सांगली : सांगलीतून चार वेळा विरोधकांना चितपट करुन विधानसभा गाठणारे माजी आमदार आणि बिजलीमल्ल पैलवान संभाजी पवार (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने मध्यरात्री निधन झाले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे.

वसंतदादा पाटील यांच्यामुळे सांगली हा कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहत आला होता. असे असताना जनता दलातून संभाजी पवार यांनी चार वेळा आपल्या विरोधकांना चितपट केले होते. विधानसभेत संभाजी पवार यांनी तडफदार व अभ्यासू आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली. विशेषत: जनता दलात असताना पवार यांच्यासह व्यंकप्पा पत्की, शरद पाटील या सांगलीकर आमदारांनी सभागृह दणाणून टाकले होते. त्यांच्या या लढवय्या कारकिर्दीचा आढावा घेणारा राजकीय पैलवान हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले आहे.

वज्रदेही मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजलीमल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदि राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता.

वसंतदादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णुअण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी जायंट किलर ही ख्याती मिळवली होती. १९८६ ते १९९९ पर्यंत तीन वेळा जनता दलाकडून आणि २००९ ते २०१४ भाजपकडून त्यांनी विधानसभेचे मैदान मारले होते.

राजकारणातील बदलांचा नेमका अंदाज असलेला राजकीय मल्ल अशी संभाजी पवार यांची ओळख होती. जनता दलातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व बदलत्या राजकीय वार्‍याचा लाभ सांगलीतून आमदार म्हणून ते निवडून गेले. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र, त्यांचा तो अंदाज पुरता चुकला. खासदार संजय पाटील यांना टोकाचा विरोध करण्याच्या प्रयत्नात त्यांचे विधानसभेचे गणित चुकले होते.

ते गेली काही वर्षे पार्किन्सन या आजाराने त्रस्त होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यात गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. मात्र, त्यांनी हिमतीने कोरोनावर मात केली होती.