अवघ्या 2 महिन्यात 5 दिग्गज माजी आमदारांच्या हाती राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपची 40 वर्षांची साथ सोडून माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कडून आणखी 4 माजी आमदारांचं देखील पक्षात स्वागत करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीनं गेल्या 2 महिन्यात पक्षप्रवेशाचा धडाकाचा लावला आहे. एकनाथ खडसे, सीताराम घनदाट, उदेसिंग पाडवी अशा तब्बल 5 माजी आमदारांनी नजीकच्या काळात राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदेसिंग पाडवी (Udesingh Kocharu Padvi) यांनी 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. गेल्या वर्षभरात पाडवी यांचा भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास झाला आहे.

परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट ( Sitaram Ghandat) यांनी 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. घनदाट हे अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून 2019 ते आमदार होते. यंदा अपक्ष रिंगणात उतरलेल्या घनदाट यांना पराभव पत्करावा लागला होता.

रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांची 30 सप्टेंबर रोजी पक्षात घरवापसी झाली. राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर शेकाप-भाजप-काँग्रेस असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास अखेर वर्तुळाकृती होऊन राष्ट्रवादीतच पूर्ण झाला.

गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. खडसेंनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी खडसे आणि शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.