माजी खासदार संजय काकडे यांचा अद्भूत, थक्क करणारा प्रवास !

पुणे : भाजी विक्रेता ते उद्योजक आणि पुढे राज्यसभेचे खासदार असा अद्भूत प्रवास आहे तो संजय काकडे यांचा. सर्वांनाच थक्क करणारी ही वाटचाल आहे ती ‘झिरो ते हिरो’!

महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे संजय काकडे. संजय काकडे 2014 मध्ये राज्यसभेवर बिनविरोध खासदार झाले. राज्यसभेच्या इतिहासात नोंद झालेली ही घटना आहे. कोणत्याही पक्षाचा सदस्य नसलेली आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेली व्यक्ती बिनविरोध निवडून जाण्याची ती पहिलीच वेळ होती. राज्यसभेवर गेल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनानंतर  संजय काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. ते भाजपाचे सहयोगी सदस्य देखील झाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयासमर्थनार्थ देशातील पहिली रॅली संजय काकडे यांनी पुण्यात काढली. यामध्ये 80 हजार पुणेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

राजकारणातील संजय काकडे यांची खरी ओळख झाली ती फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार संजय काकडे यांच्यावर पुणे महापालिकेची जबाबदारी टाकली. पुणे महापालिकेच्या इतिहासात भाजपाला कधीही महापालिकेवर झेंडा फडकावता आला नव्हता. भाजपाचे जेमतेम 25 नगरसेवक निवडून यायचे. अशा परिस्थितीत माजी खासदार संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही गाजावाजा न करता स्वतःचे नेटवर्क आणि राजकीय कौशल्य, मुत्सद्देगिरीच्या जोरावर पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

संजय काकडे म्हणजे राजकीय गणितं, आकडेवारी, मतांची गोळाबेरीज वॉर्डनिहाय संपूर्ण तपशीलासह खडा न खडा माहिती असलेला नेता. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीवेळी निकालाअगोदर वाडेश्वर कट्ट्यावर त्यांनी वर्तवलेला निवडणूक निकालाचा अंदाज तंतोतंत बरोबर आला. यावेळी त्यांनी भाजपाला 92 हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवताना, अंदाज चुकला तर, राजकीय संन्यास घेईल असे विधान केले होते आणि ते प्रचंड गाजले होते. भाजपाला मित्रपक्षांसह 98 जागा मिळाल्या. पोलीस आणि सर्व राजकीय पंडितांचे अंदाज भाजपाला सुमारे 50 जागा मिळतील असा असताना संजय काकडे यांचा अंदाज तंतोतंत बरोबर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. राजकारणासंबंधी सहज घेतले जाणाऱ्या संजय काकडे यांना या निकालानंतर मात्र गांभिर्याने घेतले जाऊ लागले.

पुढे लोकसभा व विधानसभा निवडणूक 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुणे लोकसभा व शहरातील शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरुड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या विजयासाठीची दिलेली जबाबदारी संजय काकडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

पुणेकरांप्रती विशेष आस्था व प्रेम असलेल्या संजय काकडे यांनी समान पाणीपुरवठा योजनेतील टेंडर प्रकरणातील त्रुटी सउदाहरण तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेस आणून दिल्या. त्यानंतर फडणवीस यांनी तत्काळ पुन्हा टेंडर काढण्यासंबंधी आदेश दिले होते. संजय काकडे यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर व बांधकाम क्षेत्रातील अनुभव आणि अभ्यासू वृत्तीमुळे पुणे महापालिकेचे म्हणजेच पुणेकरांचे तब्बल 800 कोटी रुपये वाचले होते.

घोरपडी पेठेत हालाखीच्या परिस्थितीत माजी खासदार काकडे यांचे बालपण गेले. एका शिक्षकाच्या घरात जन्म घेतलेल्या संजय काकडे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची वाटचाल पाहिली तर, या माणसात तुम्हाला प्रचंड कष्ट करण्याची ताकद, जिद्द, चिकाटी, दुर्दम्य इच्छाशक्ती, जबरदस्त आत्मविश्वास आणि सढळ हाताने मदत करणारा व जिवाला जीव लावणारा माणूस दिसेल. मिळालेल्या पैशांची योग्य गुंतवणूक केल्याने संजय काकडे यांच्या उद्योगाची वाढ झपाट्याने झाली.

1986 मध्ये त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल टाकले आणि ‘संजय काकडे ग्रुप’ची मुहुर्तमेढ रोवली गेली. रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारा विश्वसनीय ब्रँड म्हणून आज ‘संजय काकडे ग्रुप’ची ओळख आहे. येणाऱ्या नजीकच्या काळात भूगाव येथे 150 एकरमध्ये टाऊनशीप, कोंढवा परिसरात 250 एकरामध्ये टाऊनशीप, कोथरुडला 25 एकरमध्ये काकडे सिटी, बाणेर रस्त्यावर कमर्शिअल प्रोजेक्ट, कोरेगाव पार्कमध्ये पंचतारांकित हॉटेल इत्यादी अनेक प्रकल्प  होत आहेत.

राज्यसभेचे खासदार असताना खासदार निधीचा खर्च करताना संजय काकडे यांनी दाखविलेली दूरदृष्टी आणि संवेदनशीलता त्यांच्यातील दृष्ट्या व सहृदयी नेत्याची जाणीव करून देते. लातुर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त 37 गावांमध्ये केलेली जलसंधारणाची कामे असोत की शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक इत्यादी क्षेत्रातील कामे; हे त्याचेच निदर्शक आहे.

महाराष्ट्रात 2016 मध्ये दुष्काळाने परिसीमा गाठली होती. मराठवाड्यातील अवस्था तर, इतर भागांपेक्षा भयानक होती. लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती. दररोजची वृत्तपत्रं व वृत्तवाहिन्या याच बातम्यांनी भरलेली असायची. हे सर्व पाहिल्यावर व वाचल्यावर खासदार संजय काकडे यांचे हृदय हेलावून गेले. खासदार काकडे यांनी लातूर आणि मराठवाड्यातील आपल्या काही सहकाऱ्यांशी संपर्क केला आणि दुसऱ्याच दिवशी थेट मराठवाडा गाठला. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व शेतकरी चळवळीतील अनुभवी नेते पाशा पटेल आणि कृषी व जलसंधारण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या मदतीने खासदार काकडे यांनी लातुर जिल्ह्यातील औसा तालुका व परिसरातील 37 गावात सुमारे 1 कोटी 75 लाख रुपयांची कामे केली. यामध्ये तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण, बांध-बंदिस्ती करणे इत्यादी अनेक कामे करण्यात आली. या गावांना तत्कालिन राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी भेट देऊन सर्व कामे स्वतः पाहिली. ही कामे पूर्ण झाल्यानंतर झालेल्या पावसाने हे तलाव व नाले पाण्याने तुडुंब भरले. आणि गावांचा पाचवीला पुजलेला दुष्काळ हटला.

खासदार फंडातून संजय काकडे यांनी राज्यातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, बीड, औरंगाबाद, धुळे, परभणी जिल्ह्यांमधील विविध मतदार संघातील वर्ग खोल्या बांधण्यासाठी, शैक्षणिक साहित्य व संगणक खरेदीसाठी मदत केली. त्याबरोबरच रुग्णवाहिका दिल्या. रस्ते बांधण्यासाठी, पिण्याच्या पाण्याच्या योजना व विद्युतीकरणाच्या विकास कामांना त्यांनी निधी दिला. उद्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठीची विरंगुळा केंद्र, समाज मंदिरे, सभामंडप व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी निधी दिला आहे.

उद्योग क्षेत्राबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्राच्या पटलावर संजय काकडे यांचे नाव आदराने घेतले जात आहे ते त्यांनी केलेल्या कार्यामुळे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून जाती-धर्माच्या भिंती तोडून सर्वांच्या मदतीला धावणारा नेता म्हणून सर्व पक्ष व जाती-धर्मातील लोक संजय काकडे यांचा विशेषत्वाने उल्लेख करतात.

पुणे महापालिकेची निवडणूक आता जवळ आली असून संजय काकडे यांच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. मागच्या निवडणुकीवेळी संजय काकडे यांनी केलेली कमाल यावेळी देखील ते करणार का? म्हणून उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

माजी खासदार संजय काकडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांची वाटचाल याहून अधिक दैदीप्यमान होवो. महाराष्ट्र व देशाच्या नवनिर्माणामध्ये त्यांच्या हातून सत्कार्य व सत्कर्म घडो, याच मन:पूर्वक शुभेच्छा !