#loksabha : ‘हे’ माजी सनदी अधिकारी सांगलीत स्वाभीमानीकडून लोकसभा लढणार ?

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेची निवडणूक अगदी काही दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारी साठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरु झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काँग्रेस आघाडीत समावेशाच्या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी स्वाभिमानी काँग्रेस आघाडीत समाविष्ठ होण्याची शक्यता अधिक आहे. स्वाभिमानीच्या मागणीतील वर्ध्याची जागा काँग्रेस सोडायला तयार नाही म्हणून सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्याचा घाट शरद पवार यांनी घातला आहे. स्वाभिमानी काँग्रेस आघाडीत समाविष्ठ झाला तर सांगलीच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून माजी सनदी अधिकारी इंद्रजित देखमुख हे निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

इंद्रजित देखमुख यांना प्रशासनात कामाचा अनुभव असून त्यांनी पुणे विभागाचे विकास उपायुक्त पद देखील सांभाळले आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. इंद्रजित देशमुख मूळचे सांगली जिल्ह्यातील माहुली गावचे आहेत. वक्तृत्वावर जबर पकड असणारे इंद्रजित देखमुख हे नेहमी तरुणांच्या गराड्यात राहणारे व्यक्तिमत्व आहे. १९५२ साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत इंद्रजित देशमुख यांचे वडील दत्ताजीराव देशमुख हे आमदार झाले होते. सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाची बाब म्हणजे इंद्रजित देखमुख हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मावस बंधू आहेत.

स्वाभिमानी काँग्रेस आघाडीत समाविष्ठ झाली आणि सांगलीची जागा स्वाभिमानीला मिळाली तर इंद्रजित देशमुख हे या जागी स्वाभिमानीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. इंद्रजित देशमुख हे आघाडीचे उमेदवार असल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी  शर्थीचे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या केवळ शक्यता असल्या तरी निवडणुकीचे अंतिम चित्र काहीच दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.