माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात, AIIMS रुग्णालयातून डिस्चार्ज

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांना गुरुवारी (दि. 29) एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनमोहन सिंग याना 19 एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली होती. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल केले होते. 88 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोना लशीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. मनमोहन सिंग हे दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. तसेच ते ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञही आहेत.

दरम्यान कोरोनाची लागण होण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनावर उपाय सुचविणारे एक पत्र लिहले होते. या पत्रातून त्यांनी पंतप्रधान मोदींना देशातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला होता. कोरोनाविरोधातील लढाईत लस ही महत्वाची आहे. आतापर्यंत किती लोकांचे लसीकरण झाले आहे, याकडे लक्ष न देता एकूण लोकसंख्येपैकी कीती लोकांचे लसीकरण झाले आहे. यावर लक्ष केंद्रित करावे, असे सिंग यांनी म्हटले होते. मनमोहन सिंग यांनी लिहिलेले हे पत्र पी. चिदंबरम यांनी शेअर केले होते. सीडब्ल्यूसीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान मिळालेले सल्ले या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडे पाठवण्यात आले होते. पंतप्रधानांना लिलिहेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यांची सूचना पंतप्रधान मोदीनी स्वीकारल्याचे दिसून येत आहे.