माजी आ. शंकरराव गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडूनच लढणार : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाची अवस्था द्रौपदीसारखी झाली असून यापुढील काळात राजकीय निर्णय चुकल्यास तालुक्याचा उन्हाळा होईल. माजी आमदार शंकराव गडाख हे इतर कुठल्या पक्षात जाणार नाही, तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवतील, असे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी राजकीय दिशा स्पष्ट करण्यासाठी सोनई येथे संपन्न झालेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महामेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून उपस्थित जनसमुदयास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, क्रांतिकारी शेतकरी पक्षातूनच आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार शंकरराव गडाख यांनी जाहीर करून त्यांच्या भाजप-सेना प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला आहे. विधानसभेच्या पूर्वीच गडाखांच्या मेळ्याव्यास स्वयंस्फूर्तीने अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते गडाख म्हणाले की, सर्वत्र राजकारणाची पातळी खालावली आहे. गेल्या चाळीस, पन्नास वर्षांत आमच्या पिढीतील कार्यकर्त्यांनी साखर कारखाना, शिक्षण संस्थांचे जाळे उभारताना रात्रीचा दिवस केला, रक्ताचे पाणी केले आणि आज कुठलीही कुवत नसलेले लोक ‘गडाख तालुक्याच्या विकासाला लागलेली कीड’ आहे असे बेछूट विधान करतात तेंव्हा मनाला खूप वेदना होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सरकारच्या निधीतून केल्या जाणाऱ्या विकास कामांना आपणच केल्याची टिमकी वाजविणार्यांना सत्तेच्या माध्यमातून तालुक्यात जाऊ द्या, त्यांच्याच गावात एखादी शाळा तरी काढता आली काय? याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गेल्या तीस वर्षांतील अर्थकारण पाहिले तर मुळा कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना तब्बल 2300 कोटी रुपये मिळाले, ऊसतोडणी वाहतुकीच्या माध्यमातून 700 कोटी, कामगारांना 330 कोटी रुपये पगाराच्या माध्यमातून मिळाले, 250 कोटी रुपयांची संपत्ती कारखान्याच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांच्या नावावर उभी राहिली, असे त्यांनी स्पष्ट केले.

सहवीज प्रकल्प उभारणीचे जिल्ह्यात कोणी धाडस करत नसताना शंकररावांनी ते दाखविल्याने कारखान्याला 150 कोटी रुपये वीज विक्रीतून मिळाल्याचे सांगून वायफळ खर्च टाळण्यासाठी विश्राम गृह देखील पूर्वीच बंद करून टाकल्याकडे त्यांनी यानिमित्ताने लक्ष वेधले. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून 85 हजार विद्यार्थी तयार झाले, 2600 लोकांना रोजगार मिळाला, यासाठी आम्हाला काहीच कष्ट घ्यावे लागले नाहीत काय? आम्ही जर कीड असतो तर हे शक्य झाले असते काय? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘कीड’ तरी फवारणी करून घालवता येते पण ‘बांडगुळ’ अख्खे झाडाचं फस्त करतंय त्याचे काय असे आमदार मुरकुटेना उद्देशून त्यांनी सांगितले. आमच्या संस्थांच्या स्पर्धेत सोनई गावात एका सामान्य स्त्रीने इंग्रजी माध्यमाची शाळा नुसती सुरूच केली नाही तर यशस्वीपणे चालवून दाखवत दिडशे लोकांना रोजगार दिल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढून तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींना सत्तेत असतानाही असे का करता आले नाही? असा चिमटा त्यांनी काढला. पाठीमागे वळून एकदा आमच्या आणि तुमच्या कामांचे तुलनात्मक मूल्यमापन करून पाहा, लोकांचे प्रपंच कोणी उभे केले आणि त्यांना हवेत कोणी उडवले ते लक्षात येईल, असा टोला त्यांनी लगावला. आगामी काळात मुळा उद्योग समूहाच्या माध्यमातून 2500 सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना माजी आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यात विकास कामांपेक्षा गडाख कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन शिव्याशाप देण्याचे घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. आपल्या काळात एकदाही मुळा धरण भरलेले नसतानाही लाभक्षेत्रात तीन आवर्तनाचे यशस्वी नियोजन केल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. पाटपाण्याचे नियोजन करणे ऐर्यागैर्याचे काम नाही हे गेल्या पाच वर्षांत सर्वांनी अनुभवल्याचा टोला त्यांनी लगावला. मागील वर्षी मुळा धरणात 23 टीएमसी पाणीसाठा असताना तालुक्याला अवघे एक आवर्तन मिळाल्याने दुष्काळात 80 गावांत पिण्याचे टँकर सुरू करावे लागले, उसाच्या खोडक्या झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आपल्या काळात धरणात अवघा साडेसहा टीएमसी पाणीसाठा असताना व धारण जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असताना राजकीय ताकद पणाला लावून प्रसंगी संबंधितांना ठणकावून त्यातून तालुक्यातील 350 साठवण बंधारे व तलाव भरून घेतल्याने भर दुष्काळातही पिकांचे पान वाळू न दिल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. आमदार मुरकुटेच्या कार्यकाळात पाटपाण्यासाठी आग्रह धरणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकरवी मारहाण करण्यात येऊन गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्यात आल्याच्या दुर्दैवी घटनांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. समन्यायी पाणी वाटप कायदा विधानसभेने संमत केलेला असताना त्याचे खापर काहीही कारण नसताना एकट्या गडाखांवर फोडले जाते याची खंत व्यक्त करून जायकवाडीला पाणी जात असताना त्याला विरोध करण्याची हिंमत का दाखविली नाही, असा कळीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. साखर कारखान्याचा राजकीय वापर केला असता तर मला पराभूत करण्याची कोणात दानत नव्हती असे ठणकावून सांगत त्यांनी हे पाप आपण केले नसल्याचे समाधान व्यक्त केले.

‘बीड वॉटर ग्रीड’ला प्राणपणाने विरोध करणार
मराठवाड्याला पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली ‘बीड वॉटर ग्रीड’च्या गोंडस नावाखाली राज्यातील विविध धरणांतून पाईपलाईनद्वारे पाणी पळवण्याचा डाव अंतिम टप्प्यात शिजत आला आहे. मुळा धरणातूनही दोन टीएमसी पाणी नेण्याचे नियोजन आहे. समन्यायीच्या आडून पाणी घ्यायचे वरून बीड वॉटर ग्रीडच्या माध्यमातूनही न्यायचे हा गोरखधंदा खपवून घेणार नसून त्यास प्राणपणाने विरोध करणार असल्याचा निर्धार माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी व्यक्त केला.

‘तेच’ आता खोटे आरोप करू लागले
बाळासाहेब मुरकुटे व विठ्ठलराव लंघे हे आपल्यात असतांना भावा सारखी वागणूक दिली तेच माझ्यावर खोटे नाटे आरोप करत आहे .माझ्यावरती व कुटुंबावरती येणाऱ्या काळात नेहमीप्रमाणे खालच्या पातळीवर टीका होणार आहे, आपले बोर्ड फाडले जात आहे परंतु कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, अशी जाहीर विनंती शंकरराव गडाख यांनी कार्यकर्त्यांना केली .

आरोग्यनामा ऑनलाइन –