‘हा’ दिवस पाहण्यापेक्षा मला मरण का आलं नाही ? : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे पराभवाच्या धक्क्यातून अजूनही सावरले नाहीत असं दिसतंय. आपल्या मनातील ही प्रभावाची सल आज त्यांनी औरंगाबादमधील शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलून दाखवली. पराभव बघावा लागणं हे क्लेशकारक आहे कारण मी नेहमी लोकांसाठी आणि शिवसेनेसाठीच काम केलंय. हि माझी शेवटची निवडणूक होती, हा पराभव पाहाण्याआधी मला मरण का आलं नाही असे उदगार त्यांनी काढताना ते अत्यंत भावूक झाले होते.

या निवडणुकीनंतर मी देशभर शिवसेनेचा प्रचारक म्हणून फिरणार होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मी याबद्दल सांगितल्याचे त्यांनी म्हटले. बंगला, घर, फॉर्म हाऊस अशी संपत्ती गोळा न करता मी कायम लोकांसाठी राबलो.आयुष्यभर शिवसेना आणि हिंदू बांधवांसाठी काम केलं असं असतानाही पराभव पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग माझ्यावर आला.अशा पद्धतीने भावनिक होत त्यांनी शिवसैनिकांसमोर आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

बछड्यांच्या नामकरणातून निर्माण झाला नवा वाद :
माजी चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्यात आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद आहे शहरातील सिद्धार्थ उद्यानातील वाघिणीने जन्म दिलेल्या चार बछड्यांच्या नामकरनाचा. दिनांक 26 एप्रिल रोजी जन्मलेल्या नर बछड्याचे नाव कुश आणि तीन मादी बचड्यांची नावे अर्पिता, देविका आणि प्रगती अशी ठेवण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने हा नामकरण सोहळा पार पडला.नागरिकांना बछड्यांसाठी नावं सुचवण्याचे आवाहन महापालिकेने केल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल अडीच हजार नावे सुचवली होती. या नावांतूनच बछड्यांचे नामकरण करण्यात आले.

कार्यक्रम पत्रिकेत खासदार इम्तियाज जलील यांचे नाव नाही, एमआयएम कार्यकर्ते आक्रमक :
नामकरण सोहळ्यासाठी शहरातल्या आमदारांना आमंत्रण देण्यात आले होते ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

परंतु नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे नाव मात्र यामध्ये डावलण्यात आले. त्यामुळे महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणावर आक्रमक आणि अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.