सामाजिक बांधिलकी आणि विकासकामांसाठी जेजुरीतील माजी विद्यार्थी एकत्र

अनेक अधिकारी उद्योजकांनी व्यक्त केल्या भावना

पुरंदर : पोलिसनामा ऑनलाईन – थट्टाह-मस्करी,गप्पा-टप्पा, हास्यविनोद, एकदुसऱ्याच्या फिरक्या घेत बालपणीच्या शालेय आठवणी, खोडकरपण, जीवनात यशस्वी होण्यासाठी केलेला संघर्ष या विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये आजचे उद्योजक, सेवानिवृत्त झालेले अधिकारी रमून गेले.

जेजुरी शहरातील जीवन, शिक्षण, विद्यामंदिर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय असा १ ली ते १०वी पर्यंतचा प्रवास करणारे १९६३ ते ७४ सालातील विद्यार्थी उद्योजक सुरेश काळे, ताज फ्रोजन फूड्सचे चेअरमन उत्तम झगडे जेजुरीत एकत्र आले होते. यामध्ये ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भोसले, ऍड.भास्कर देशमुख, ऍड. दिलीप दीक्षित, माजी नगराध्यक्ष मनोहर भापकर, अभियंता सुरेश पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद बेलसरे, उद्योजक सदानंद खाडे, दिलावर मणेर, फिरोज पानसरे, हरिभाऊ झगडे, राजेंद्र थोरात, दिलीप गायकवाड, सतिश देशमुख, संजय दंडनाईक, उद्योजक आत्माराम पेशवे, जयंत पेशवे, नंदकुमार निरगुडे आदींंसह सुमारे ७५ वर्गमित्र एकत्र आले होते.

शालेय जीवनाबाबत बोलताना उद्योजक उत्तम झगडे म्हणाले की, त्या काळात कंदील-दिव्याच्या उजेडात अभ्यास करावा लागायचा, गरिबीमुळे पुस्तके,शालेय साहित्य मर्यादित असायचे, गणवेश तर एकच असायचा बूट-चप्पल थेट दहावीनंतरच मिळाली. त्या काळात गरिबीशी झुंज देत शिकण्यासाठी जिद्द व स्पर्धा असायची खोडकरपणा अंगी असला तरी गुरुजनांचा आदर असायचा एकमेकांची पुस्तके घेऊनच अभ्यास करायचो असे अभियंता सुरेश पवार यांनी सांगितले. वर्गात सेक्रेटरी होण्याचा बहुमान मिळायचा पुढे या धाडसाचा उपयोग पोलीस खात्यात सेवा करताना झाला असे उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद बेलसरे यांनी जुन्या आठवणीत रमताना सांगितले.

नेहमी वर्गात मागील बेंचवर बसलो तरी राजकारणात जाता आले असे माजी नगराध्यक्ष मनोहर भापकर यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी व गावच्या ओढीने एकत्र येत पुढील काळात सामाजिक कार्यात व विकासकामांमध्ये योगदान देणार असल्याचे उद्योजक सुरेश काळे यांनी सांगितले.

डॉ. रमेश भोसले, ऍड. भास्कर देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. त्याकाळात विद्यादान करणारे जेष्ठ माजी प्रा. हरिशचंद्र कराळे, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय कोळीळ यांचा सन्मान जेजुरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक अंकुश माने यांचे हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन सुरेश झगडे यांनी तर बाळासाहेब विभाड यांनी आभार मानले.