माजी उपसरपंचाची नक्षलवाद्यांकडून गोळया झाडून हत्या

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच व आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते रामा तलांडी (वय ३७) यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

उपसरपंच रामा तलांडी हे आदिवासी विद्यार्थी संघामार्फत एटापल्ली तालुक्यात सामाजिक कार्य करीत असत. बुर्गी येथील एका लग्न समारंभात डी जे लावत असताना साध्या वेशात आलेल्या नक्षलवाद्यांनी तलांडी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या व ते जंगलात पळून गेले. रामा तलांडी यांचा जागीच मृत्यु झाला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षापूर्वी बुर्गी येथे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते. त्यावेळी रामा तलांडी यांनी फडणवीस यांच्याकडे रस्ते व मोबाईल टॉवरची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.