Pune : राज्य अन् जिल्ह्याच्या आकडेवारीचा घोळ मिटेना, पुण्यात नक्की कोरोनाबाधित रुग्ण किती?

पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. मात्र असे असताना जिल्हा आणि राज्याची कोरोना आकडेवारी काही केल्या जुळताना दिसत नाही. दोन्हीच्या आकडेवारीत मृतांचा संख्येत जवळपास सव्वातीन हजाराचा फरक दिसत आहे. आकडेवारीचा पोर्टलवरील अपडेशनमुळे हा फरक दिसत असल्याचा दावा राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र आकडेवारी उशिरा भरली तरी एवढा मोठा फरक कसा राहतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्याचा आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात आजपर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 8,02807 तर जिल्हा परिषदेचा आकडेवारी नुसार ही संख्या आहे 7, 99, 232 म्हणजे एकुण रुग्ण संख्येत जवळपास 3575 रुग्णांचा फरक आहे. एकीकडे राज्याच्या आकडेवारीत रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. तर दुसरीकडे मृतांच्या संख्येत मात्र अगदी उलटा घोळ दिसत आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या 9034 आहे, तर जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार संख्या 12457 आहे. राज्याच्या आकडेवारीत दाखवलेले इतर 55 मृत्यू धरले तरी ही या आकडेवारीत सव्वातीन हजारांचा फरक आहे. याबाबत राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, हा फरक पोर्टलवर आकडेवारी अपडेट करण्यामुळे येतो. आम्ही केंद्राच्या पोर्टलवरची आकडेवारी फॉलो करतो. त्यावर जिल्ह्याकडची आकडेवारी रोज अपडेट होईल, असे नाही. त्यामुळे हा फरक दिसतो. जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद म्हणाले की, आकडेवारीतील फरक हा पत्ता शोधण्यावरून होत आहे. त्या माणसाचा पत्ता सापडेपर्यंत आकडेवारीत नोंद केली जात नाही. हा फरक कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान पुण्यात मृत झालेल्या व्यक्तींची नोंद ही पुण्याची नोंद म्हणून केली जाते. तर ती व्यक्ती दुसरीकडची असू शकते म्हणजे इतर जिल्ह्यातील व्यक्ती इथे ट्रीटमेंट घेतात त्यांची नोंद इथले मृत्यू म्हणून होते. त्याचा परिणाम म्हणून हा फरक दिसत असल्याचे ते म्हणाले.