विद्यापीठांना परीक्षा घेण्यास परवानगी, गृहमंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याना परिक्षा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला असून राज्यांच्या शिक्षण विभागाला तसे पत्रही पाठवण्यात आले आहे. उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांना अद्याप परीक्षा घेण्यास परवानगी नव्हती. परंतु गृहमंत्रालयाने उच्च शिक्षण सचिवांना पत्र लिहून याला मान्यता दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला पत्र पाठविले असून विद्यापीठांनना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे.

तसेच उच्च शिक्षण संस्थाही परीक्षा घेऊ शकणार आहेत. मात्र, या परीक्षा युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. युजीसीही लवकरच परीक्षांसाठी नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय आरोग्य खात्याच्या नियमांनुसार परीक्षा व्हाव्यात, असेही या पत्रात म्हटले आहे.
गृहमंत्रालयाच्या परवानगीने सर्व विद्यापीठे, भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय विज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था आणि इतर सर्व उच्च शिक्षण संस्था त्यांची अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यास सक्षम असतील.

कोरोना साथीच्या आजारामुळे बऱ्याच उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांना अद्याप परीक्षा घेता येऊ शकल्या नाहीत. दरम्यान, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला या निर्णयामुळे दणका बसला आहे. ठाकरे सरकारने जरी परीक्षा रद्द केलेल्या असल्या तरीही विद्यापीठांना परीक्षा घ्याव्या लागणार असल्याचे दिसत आहे.