मुंबई, ठाणे वगळता प्रमुख शहरातून शिवसेना ‘हद्दपार’ ! सेनेचं जागावाटप मुख्यमंत्र्यांनीच केलं ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युतीतील जागा वाटप मुख्यमंत्री करतील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. सुरुवातीला ते गमतीने बोलत असल्याचे वाटले होते. पण आता जागावाटप समोर आल्यानंतर खरोखरच शिवसेना कोणत्या जागा लढविणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे वगळता राज्यातील प्रमुख शहरातून शिवसेना हद्दपार झाली आहे.

शिवसेनेला नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या चार प्रमुख शहरात एकही जागा सोडण्यात आलेली नाही. या शहरातील १९ जागांपैकी एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली नाही. राज्यातील प्रमुख ८ शहरात ६४ जागा येतात, त्यापैकी २५ जागा शिवसेना लढवत असून भाजपा २९ जागा लढवत आहे. त्यातूनच आता मोठा भाऊ कोण हे स्पष्ट झाले आहे.

मुंबईमध्येही शिवसेनेचे वर्चस्व संपत असल्याचे समोर येत आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी १९ जागा शिवसेना लढवत असून त्यांच्या बरोबरीनेच १७ जागांवर भाजपाचे उमेदवार असणार आहेत. नाशिक येथे शिवसेनेचा खासदार आहे. तरीही तेथे एकही जागा शिवसेनेला मिळू शकली नाही. अशीच स्थिती नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे शिवसेनेची आहे. त्याचा उद्वेग नवी मुंबई, नाशिकमध्ये झाला आहे.

Visit : policenama.com