अरे देवा ! मराठवाडयातील पिकांना पावसाचा जबर फटका, 7 मंडळांत अतिवृष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मराठवाड्यातील नांदेड जिल्हातील एक व परभणी जिल्ह्यातील ६ मंडळांना मागील चोवीस तासांत पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा काही भागांत अतिवृष्टी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नांदेड जिल्हात एक तरुण पैनगंगेत वाहून गेल्याने मरण पावला. तर परभणी जिल्ह्यातील नगर जवळ (ता. मानवत) शेतात वीज पडून गोरक्ष बालाजी रासवे (वय १७) हा तरुण ठार झाला.

रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने परभणी जिल्ह्यातील सहा मंडळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाथरी तालुक्यात बाबाळगाव मंडळात ७७ मि. मी, कासपुरी मंडळात ७४ मि. मी, जिंतूर तालुक्यात बोरी मंडळात ७४ मि. मी, चारठाणा मंडळात ७५ मि. मी आणि वाघी धानोरा मंडळात ६६ मि. मी आणि सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात ६६.८ मि. मी पावसाची नोंद करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, पैठण, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, सोयगाव तालुक्यातील बहुतांश गावात पावसाचा जोर वाढल्याने मका आणि कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, परांडा, भूम, तुळजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक ३८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा महसूल मंडळात सोमवारी ८३.२५ मि. मी. ची अतिवृष्टी झाली. हदगाव, भोकर, किनवट, लोहा, उमरी तालुक्यात देखील पाऊस झाला. बीड तालुक्यात सुद्धा पावसाने हजेरी लावली असून, माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले.

पैनगंगेत शेतमजूर वाहून गेला

शेतातून घरी येताना पैनगंगा नदीत वाहून गेल्याने सचिन नरेंद्र चव्हाण (मांडवी. जि. नांदेड) या शेतमजुराचा मृत्यू झाला. तद्वतच जिल्ह्यातील खंबाळा मधील २३ वर्षीय शेतमजूर तरुणाचा मृतदेह विदर्भातील राजापेठ शिवारात मच्छिमार करणाऱ्यांना सोमवारी सापडला. नंतर हा मृतदेह खंबाळा या गावी आणण्यात आला. किनवटचे तहसीलदार उत्तमराव कागणे यांनी येथे भेट देत पाहणी केली.

मांजरा प्रकल्पात ७२.७२ टक्के पाणीसाठा

मागील दोन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात दमदार पावसाची नोंद झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या १ जूनपासून पाणी येत असून, सोमवारी प्रकल्पात ७२.७२ टक्के पाणीसाठा झाल्याने लातूरसोबत, केज, अंबेजोगाई, धारूर, लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे.