Pune News : दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दादा लक्ष्मण नलगे असे आत्महत्या करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. दौड पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या तारामती इमारतीमध्ये शनिवारी (दि.2) सकाळी नऊच्या समारास ही घटना घडली. दादा नलगे यांनी आजारपणामुळे हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दादा नलगे हे श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचे चिरंजीव होते. त्यांनी दौंड येथील राहत्या घरी गोळी झाडून घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेलगे कुटुंबीय हे बबनराव पाचपुते यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. दादा नलगे यांच्या मागे आई-डील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहीण, वहिनी असा परिवार आहे. या घटनेने श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्यात दादा नलगे यांच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तसेच नलगे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दादा नलगे यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत.