Pune News : मोबाइल घेऊन देत नाहीत; 9 वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

वाल्हे : पोलीसनामा ऑनलाईन – एका नववीत शिकणाऱ्या मुलाने घरचे मोबाईल घेऊन देत नाही म्हणून शनिवारी आत्महत्या केली आहे. हि घटना वाल्हे येथील सिध्दार्थ नगर शेजारील दोडके वस्ती मध्ये घडली आहे. आदित्य रविद्र दोडके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आदित्य हा आपले आई – वडील, व आजीकडे मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह करत होता. मात्र घरचे त्याला मोबाईल घेऊन देण्यास नकार देत होते. शनिवारी सकाळी आजीने दोन महिन्यांची पेन्शन आली की लाईटबिल भरू आणि तुला मोबाइल विकत घेऊ असे बोलून त्याची समजूत काढली. मात्र घरच्यांवर रुसलेल्या आदित्यने शनिवारी सकाळी घरातील एका खोलीचा दरवाजा बंद करुन साडीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हि घटना वाल्हे पोलिस चौकीतील पोलीस संतोष मदने यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आदित्यला खाली काढून जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा पुढील तपास जेजुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस संतोष मदने, संदीप मोकशी व केशव जगताप यांच्याकडून करण्यात येत आहे.