Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मित्राच्या नात्यातील महिलांशी जवळकीचा संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी येथील नदीपात्राजवळ ही खळबळजनक घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघावर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

संजय महादेव गोरवे (वय 23, रा. टाकळी (टेंभुर्णी), ता.माढा, जि. सोलापूर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मृताची आई मंजुषा महादेव गोरवे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बावडा येथील दादा कांबळे, लकी विजय भोसले, विकी उर्फ व्यंकटेश भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय व लकी, विकी व महेश हे एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळे संजयचे मित्राच्या घरी जाणे- येणे होते. यातुनच संजयचे लकी, विकी व महेश यांच्या नातेवाईक असलेल्या मनिषा, बायडाबाई व निकिता (नावे बदलली आहेत) यांच्याशी ओळख होऊन त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्याचा फायदा घेत वरील तिन्ही महिला संजय याला छोट्या-मोठ्या कामासाठी घरी बोलवत असत. यावरून संजय व त्यांच्यात जवळकीचे संबंध असल्याचा संशय त्याचे मित्र लकी, विकी व महेश यांना आला. त्यातून त्यांनी संगनमताने संजयचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले.

आरोपी मित्रांनी संजयला बावडा येथे जेवणाचा कार्यक्रम असल्याचे खोटे निमंत्रण देत रविवारी संध्याकाळी बोलावुन घेतले होते रात्रीच्यावेळी भीमानदीच्या गारअकोले पुलाजवळील नदीपात्राजवळ नेत धारदार हत्याराने संजयचे हात, दोन्ही पाय व डोके धडावेगळे करत त्याचा निर्घृण खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तोडलेले अवयव इतरत्र फेकून दिले. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याची भीमानदीच्या पात्रात विल्हेवाट लावली. पुढील तपास इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे करत आहेत.