भाजपा आमदाराची अजित पवारांकडे मागणी, म्हणाले- 2 दिवसांच्या वेतन निधीतून पोलीस अन् आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी विविध क्षेत्रातून आर्थिक मदत देण्यात येत आहे. सरकारने याबाबत दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे. तसेच राज्यातील सर्वच सरकारी अधिकारी आणि कर्मचा-यांनी 1 किंवा 2 दिवसांचे वेतन द्यावे, अशी सूचना सरकारने केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र या आदेशातून पोलीस आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वगळावे, अशी मागणी भाजपा आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. या सेवेतील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून दिवस रात्र काम केले आहे. सुट्याही घेतल्या नाहीत, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना शासनाने कोविड योद्धा म्हणून अधिकचा भत्ता द्यावा, असेही आमदार कथोरे यांनी पत्रात म्हटले आहे.

याबाबत आमदार कथोरे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना लढ्यात विविध क्षेत्रांतून सरकारला आर्थिक मदत येत आहे. राज्यातील कोरोना आपत्ती नियोजनासाठी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांबरोबरच राज्य सरकारी, निमसरकारी, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगर परिषदा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनातून एक किंवा दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री मदत निधीस देण्याच्या सूचना केल्या आहेत. हे वेतन कपात करण्यास कुणाची हरकत असल्यास तसे लेखी पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे, असे नमूद केले आहे. मात्र, या आदेशातून पोलीस कर्मचारी आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळावे,अशी मागणी आमदार कथोरे यांनी केली आहे.

पोलीस दलातून विरोध
राज्य सरकारच्या या निर्णयाला सरकारी कर्मचारी, अधिकारी तसेच त्यांच्या विविध संघटनांनी सहमती दर्शवली आहे. मात्र या निर्णयाला पोलिस दलातून विरोध होत आहे. दिवसरात्र जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावल्यानंतरही वेतन कापणे योग्य नाही, असे म्हणत अनेकांनी या वेतन कपातीस हरकत घेतली आहे.