अनन्या पांडे, सारा अली खान नंतर घराणेशाहीच्या वादात आता तापसी पन्नूची ‘उडी’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील सतत धगधगणारा विषय म्हणजे स्टारकिड्सवर होणारे घराणेशाहीचे आरोप. स्टारकिड्सची घराणेशाहीच्या आरोपाला उत्तर देताना उडणारी हबेलहंडी प्रेक्षकांना चांगलीच करमणूक ठरते. तात्पुरत्या शांत झालेल्या ज्वालामुखीची उपमा या वादाला दिली जाते ती उगीच नाही.

अनेक सेलेब्रिटीजसह अनन्या पांडे, सारा अली खान यांच्यानंतर आता तापसी पन्नू या अभिनेत्रीनेही घराणेशाहीच्या वादात आता उडी घेतली आहे. खरेतर घराणेशाहीच्या आरोप-प्रत्यारोपांची सुरुवात झाली ती करण जोहर आणि कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानांनंतर. तेव्हापासून हा मुद्दा बॉलिवूडमध्ये कायमच वादाचा मुद्दा झाला आहे. अनेक स्टारकिड्सना घराणेशाहीच्या या आरोपाला उत्तर देताना अस्वस्थ केले आहे.

घराणेशाहीच्या या मुद्दयावर बोलताना गुणी अभिनेत्री तापसी पन्नू म्हणते की स्वतःच्या गुणवत्तेच्या आधारावर बॉलिवूडमध्ये पुढे येणे अत्यंत कठीण आहे. मात्र घराणेशाहीचा आपल्याला वैयक्तिकरीत्या कोणताही त्रास झालेला नाही. आपण आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावरच पुढे आलो आहोत, हे
सांगायलाही तापसी कमी करत नाही. चांगल्या अभिनयामुळे तापसी पन्नूचे इंडस्ट्रीत चांगले नाव आहे. त्यामुळेच तिच्या घराणेशाही या विषयावर बोलण्याला महत्त्व आहे.

नुकतेच अनन्या पांडेला या विषयावरील आपल्या मतप्रदर्शनाबद्दल सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. सैफकन्या सारा अली खाननेही नुकतेच म्हटले होते की सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आता तापसी पन्नूनेही घराणेशाहीच्या बाटलीबंद राक्षसाला पुन्हा बाटलीबाहेर काढले आहे.

तुम्ही स्टारकिड आहात, हे तुमच्या चेहर्‍यावरच दिसते. तेव्हा त्यापासून कोणी दूर पळू शकत नाही. सध्या स्वतःच्या अभिनय कौशल्यावर बॉलिवूडमध्ये आपले नाव करणार्‍यांची संख्या वाढताना दिसत आहे. घराणेशाहीचा वाद हा माध्यमांनी निर्माण केलेला आहे. कलाकारांनी या विषयाला महत्त्व दिलेले नाही. एखाद्या बातमीचे अनेक पैलू असू शकतात हेही तेवढेच खरे आहे. स्टारकिड असणे म्हणजे काही गुन्हा नाही. त्यांना आपण स्टारकिड या लेबलसह स्वीकारलेलेच उत्तम. शेवटी आपले नाणे खणखणीत असेल तरच प्रेक्षक आपल्याला स्वीकारतील. हेच अंतिम सत्य आहे.

थप्पड या तापसी पन्नूच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनाही तो आवडला. या चित्रपटातील विषयाची धाडसी हाताळणी सर्वांनाच आवडल्याचे मिळालेल्या भरभरून प्रतिसादाने लक्षात आले. येत्या 28 फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.