Coronavirus : सोलापूरमध्ये कोरन्टाईनचा ‘शिक्का’ पाहून महिलेवर ‘बहिष्कार’ !

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाचा धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे साधा खोकला, ताप, सर्दी असणार्‍या नागरिकांकडे लोक संशयाने पाहत आहेत. अशाच एका घटनेला सोलापूरातील वाडयावस्त्या व झोपडपट्टयांमध्ये जाऊन सर्वाच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या एका आशा स्वयंसेविकेला सामोरे जावे लागत आहे. साध्या खोकल्यामुळे त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारला होता. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयावरून महिलेला अमानवी वागणूक देत तिला व कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न उजेडात आला आहे. अखेर या स्वयंसेविकेला कुटुंबीयांसह प्रशासनाने एका तात्पुरत्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.

चार ठिकाणांहून हुसकविल्यानंतर ही महिला पोलिसांकडे गेली. पोलिसांनीही तिला मदत न करता पुन्हा शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने शासकीय रुग्णालयात जाऊ न डॉक्टरांना अडचण सांगितली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने आशा स्वयंसेविका संघटनेच्या नेत्यांशी संपर्क साधून मदत मागितली.

शहरातील न्यू बुधवार पेठेत पती व दोन चिमुकल्यांसह राहणार्‍या या महिलेला घशाचा संसर्ग झाला. यावर तिने शासकीय रुग्णालयात जात उपचार घेतले. खबरदारी म्हणून तिला 14 दिवस ‘होम क्वोरंटीन’ चा सल्ला दिला. त्यानुसार तिच्या हातावर शिक्काही मारला. तिचा हा शिक्का शेजारच्या काही महिलांनी पाहिल्यावर कोरोना झाल्याचा संशय घेत परिसरातील नागरिकांनी तिला दुसरीकडे जाण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे वैतागून तिने कुटुंबासह माहेरी आसरा घेतला. परंतु तिथेही तिला विरोध झाला. यानंतर तिने तुळजापूर वेशीत मावशीचे घर गाठले. तिथूनही तिला हुसकाविण्यात आले. त्यामुळे आता कोरोनामुळे नागरिकांच्या मनात संशयाचे काहूर माजले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like