निकालाआधीच ‘आघाडीत’ बिघाडी, एक्झिट पोलनंतर राष्ट्रवादीने फोडले काँग्रेसवर ‘खापर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात 60.46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहिर झाले. या एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना-रिपाइं महायुती 210 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीला 63 जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना 15 जागा मिळतील. असे असले तरी खरे चित्र 24 ऑक्टोबरला समजणार आहे.

पराभवाचे खापर काँग्रेसवर
मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तू-तू, मैं-मैं सुरु झाले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संभाव्य पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे. पूर्ण निवडणुकीत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी प्रचारामध्ये दिसल्या नाही. राहुल गांधी आले पण काँग्रेसचेच नेते त्यांच्या सभांमध्ये दिसले नाहीत. फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकट्यांनीच मेहनत केली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी म्हटलं आहे. जनतेने आमच्या बाजूने कौल दिला नाही हे आम्हाला मान्य आहे, काँग्रेसशी आघाडी करणं हा आमचा नाईलाज होता, स्वबळावर निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे मेमन यांनी म्हटले.

विभागनिहाय आकडेवारी
मुंबई : महायुती 31, महाआघाडी 04, इतर 01
कोकण : महायुती 32, महाआघाडी 05, इतर 02
मराठवाडा : महायुती 28, महाआघाडी 13, इतर 06
पश्चिम महाराष्ट्र : महायुती 44, महाआघाडी 23, इतर 03
उत्तर महाराष्ट्र : महायुती 26, महाआघाडी 10, इतर 00
विदर्भ : महायुती 49, महाआघाडी 08, इतर 03

Visit  :Policenama.com