Exit Poll 2019 : महाराष्ट्रात महायुतीला ‘फटका’ ; जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार !

मुंबई : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी मतदान झाले असून राज्यात भाजपासह एनडीएने २०१४ मध्ये ४२ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळवता आल्या होत्या. मात्र, यंदाच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला फटका बसणार आहे. मागीलवेळी ४२ जागा मिळवणाऱ्या महायुतीला यंदा ३४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर युपीएच्या जागांमध्ये वाढ झाली आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल (एक्झिट पोल) यायला सुरुवात झाली आहे. युपी नंतर महाराष्ट्राचा एक्झिट पोल आला असून यामध्ये महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत. तर मागीलवेळेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या आहेत. तर स्वाभीमानी संघटनेला मागील वेळेप्रमाणेच यंदाही एकच जागा मिळण्याची शक्यता आहे.

नेल्सनच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजपाला १७, शिवसेनेला १७, काँग्रेसला ४, राष्ट्रवादी ०९ आणि इतर १ अशा जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळताना दिसत नाही. २०१४ साली महायुतीने ४२ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा या जागा कमी होताना दिसत असून महायुतीच्या ८ जागा कमी होताना दिसत आहे.

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी काँग्रेच्या जागा वाढल्या असून यंदा काँग्रेसला ४ जागा मिळतील. काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २०१४ मध्ये ४ जागा मिळाल्या होत्या. यंदा पाच जागांचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार असून राष्ट्रवादीला ९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.