एक्झिट पोलचा अंदाज हा अंतिम निकाल नाही, पण भाजप सत्तेत येण्याचे संकेत : नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – एक्झिट पोलने वर्तवलेला अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही, पण भाजप सत्तेत येण्याचे ते संकेत आहेत. देशात पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीन गडकरी यांनी हा दावा केला आहे.

नितीन गडकरी यांच्या हस्ते अभिनेता विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम मोदी’ या सिनेमाच्या पोस्टरचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी गडकरी यांनी संवाद साधला. गडकरी म्हणाले, एक्झिट पोलचे अंदाज म्हणजे अंतिम निकाल नसले तरी त्यातून काही संकेत मिळतात. एक्झिट पोलचा सर्व समावेशक विचार करता एक्झिट पोलच्या अंदाजाचं प्रतिबिंब निवडणूक निकालात दिसतंच, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि केंद्रात एनडीएचं सरकार येईल. महाराष्ट्रातही २०१४ सारखेच निकाल लागतील, असंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत तुम्हीआहात का? असा सवाल केला असता या बाबत मी २० ते २५ वेळा स्पष्ट केलं आहे. आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो. त्यामुळे स्वाभाविकपणे तेच पंतप्रधान होतील, असं ते म्हणाले. देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामावर विश्वास दाखवला आहे, असंही त्यांनी सांगितलं. कुणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं आणि कोणतं नाही, याचा अधिकार पंतप्रधानांनाच आहे, असंही त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलं.

यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉयने बॉलिवूडची एकजूट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. फिल्मी कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. त्यामुळे त्यांच्यात एकी असणं आवश्यक असल्याचंही त्याने सांगितलं.

You might also like