शहराच्या विकासासाठी तज्ञांची सल्लागार समिती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगरला ऐतिहासिक वारसा आहे. त्याला विकसित करण्याची गरज आहे. म्हणून शहराचा विकास करण्यासाठी सामाजिक संघटना, एनजीओ, सेवानिवृत्त अधिकारी, वैद्यकीय, वकिली अशा सर्व क्षेत्रातील तज्ञ मंडळींची सल्लागार समिती नियुक्त करण्यात येणार आहे, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

शहरातील एका हॉस्पिटलच्यावतीने नवनिर्वाचित महापौर वाकळे व उपमहापौर मालनताई ढोणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. प्रीतो थारात, विजय निकम, राहुल हिरे, डॉ. अमोल कासवा, डॉ. महेश घुगे, डॉ. अमोल गडाख, डॉ. सचिन उदमले, डॉ. संदीप सायकर, डॉ. दशन चकर, युनूस टेग आदी उपस्थित होते.

वाकळे म्हणाले की, नगर एक चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यांचा वापर करून शहराच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातील. सीना नदीचे लवकर सुशोभीकरण करणार असून, एक वर्षाच्या आत 100 आसन क्षमता असणारे सुसज्ज सर्वसोयींयुक्त अत्याधुनिक नाट्यगृह केले जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ. बापूसाहेब कांडेकर म्हणाले की, तरुण पिढी ही उद्योग व्यवसायासाठी नगरच्या बाहेर जात आहे. नगर शहर सेवानिवृत्तांचे शहर बनू पाहत आहे. सेवानिवृत्तांचे शहर अशी नवी ओळख व्हायला सुरुवात झाली आहे. शहरात चांगले उद्योग
कसे येतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहराच्या विकासासाठी ‘एनजीओ’ सामावून घेतल्यास निश्चितच नगरचा चेहरा बदलेल.