महाराष्ट्रात अचानक का वाढला ‘कोरोना’ ? केंद्रीय तज्ज्ञ समितीने सांगितली ‘ही’ प्रमुख कारणे

मुंबई : राज्यात रविवारी कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ नोंदविली गेली आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. हा आकडा चिंतेत भर घालणारा आहे. कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत असताना अचानक ही परिस्थिती कशी उद्भवली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केंद्र सरकारने पाठविलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने नुकताच राज्याचा दौरा केला. अचानक वाढलेल्या कोरोनाच्या कारणाचा या पथकाने खुलासा केला आहे.

कोरोना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे लोकांच्या मनात नसलेली भीती असल्याचे या पथकाने सांगितले.

लसीकरण सुरू झाल्याने तसेच मृत्युदर कमी असल्याचे वारंवार सांगितले जाऊ लागले. त्याचा उलटा परिणाम झाला असून, कोरोनामुळे कोणी मरत नाही, त्यामुळे लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्याचबरोबर सामान्यांसाठी लोकलही सुरू झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध झाल्याने लोकांचा प्रवास वाढला. या कारणांमुळे कोरोना झपाट्याने वाढू लागला.

त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे सातत्याने सांगितले जात असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवरही झाला. गेली १० ते ११ महिने २४ तास दक्ष असलेली आरोग्य यंत्रणा सुस्तावली. चाचण्यांची संख्या झपाट्याने कमी केली. कॉटँक्ट ट्रेसिंग बंद झाले. त्याचवेळी लक्षणे नसलेल्या व त्यामुळे चाचणी न केलेले सुपर स्पेडरांची संख्या वाढली. त्यामुळे राज्यातील अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे.

चाचण्यांच्या संख्येत वाढ आणि कॉटँक्ट ट्रेसिंगकडे लक्ष देणे, आरोग्य यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करणे, लोकांमध्ये पुन्हा जागृती करून त्यांच्यावरील निर्बंध वाढविणे असे उपाय या समितीने सुचविली आहेत.