वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या चित्रा वाघ आहेत तरी कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, सरकारला या प्रकरणी कोंडीत पकडणाऱ्या चित्रा वाघ आहेत तरी कोण, हे काहींना माहिती असेल तर काहींना कदाचित नसेल.

पूर्वीश्रमीच्या अखिल भारतीय सेनेतून चित्रा वाघ यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा होत्या. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. याच चौकशीतून वाचण्यासाठी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आक्रमक
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राचे राजकारण तापत आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी याप्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आग्रही झाल्या आहेत.