कारखान्यात झालेल्या स्फोटात १ ठार, २ जखमी

परळी(वैजनाथ ) : पोलीसनामा ऑनलाईन – गजानन एक्स्ट्रेशन या रिफाईंड ऑईल व पेंड निर्माण करणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १ ठार आणि २ जखमी झाल्याची भीषण घटना बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी घडली आहे. कारखाना परिसरात साठवून ठेवलेल्या केमिकल कॅन्ड साठवून ठेवलेल्या भागात अचानक झालेल्या स्फोटातून हा सर्व प्रकार घडला आहे. या स्फोटात तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

गजानन एक्स्ट्रेशन या रिफाईंड ऑईल व पेंड निर्माण करणारा कारखाना परळी शहरा लागत आहे. सदरचा कारखाना मागील दोन वर्षांपासून बंद आहे. सध्या या कारखान्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या स्फोटात हा भीषण प्रकार घडला आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नसले तरी ज्वलनशील असलेल्या केमिकल ड्रग्सचा आगीशी संपर्क आल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या स्फोटात अकोला येथील गोपाळ गंगणे यांचा मृत्यू झाला आहे. तर ज्ञानोबा लुंगेकर आणि गोपाळ घाटोळकर हे दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी व्यक्तींवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.