फटाक्याच्या कारखान्यात भिषण स्फोटाने परिसर हादरला, 5 ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

शामली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील शामली येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भिषण स्फोटामध्ये पाच मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे मजूर कारखान्यात काम करत असताना हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील शामली येथे दिल्ली – सहारनपूर महामार्गावर कंधला येथे आज (शुक्रवार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

या स्फोटामध्ये निर्मला देवी, नरेसो देवी, शौंकी, राजेंद्र सरस्वती देवी, विरेंद्र इंतजार या पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल. सायंकाळी अचानक स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात कारखान्याला आग लागली. स्फोटामुळे कारखान्याचे छप्पर उडून गेलेच तर कारखान्याच्या भिंतीही कोसळल्या. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे कारखान्यातील कामगारांची एकच धावपळ उडाली.

या स्फोटाचा आवाज काही किलोमीटर पर्य़ंत ऐकायला मिळाला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, स्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला हे समजू शकेल असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.